नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये अद्यापही काही प्रमाणात तणाव कायम आहे. अशातच केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाला एक गंभीर इशारा देत सावध राहण्यास सांगितले आहे. केंद्राने राज्यांना, उद्योग आणि संशोधन संस्थांना संशयास्पद आणि अनपेक्षित बियाणांच्या पार्सलबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशाच्या जैवविविधतेसाठी धोकादायक ठरू शकतात असे बियाणे यात असू शकतात, असं इशारा केंद्राने दिला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये गेले आहेत. या अनपेक्षित पार्सलच्या माध्यमातून साथीचा रोग पसरू शकतो. आणि जर बियान्यांमार्फत साथीचा रोग पसरला तर त्याला नियंत्रणात आणणे अवघड होईल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील संशोधन आणि उद्योगसंस्थाना विविध कारणामुळे काही बियाण्यांचे पार्सल येतील. जर ते पार्सल अनपेक्षित आणि संशयास्पद असतील तर अशा बियाणांच्या पार्सलबाबत जागृत राहण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.
याविषयी बोलताना कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आपण आधीच चीनमधील कोरोनाशी लढाई करत आहोत. आता जर बियाण्यांद्वारे साथीचा रोग आला तर ते हाताळणे कठीण होईल. आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
बियाण्यांद्वारे वनस्पतींचे रोग पसरवता येतील ही केवळ एक चेतावणी आहे. त्याला 'सीड टेररिजम' म्हणणे योग्य नाही. कारण बियाण्यांद्वारे रोगाचा प्रसार करण्याच्या मर्यादा आहेत. पण तरीही धोका आहे. अशा पार्सलमधून येणारी बियाणे तण असू शकते जी भारतातील मूळ झाडे आणि वनस्पतींसाठी धोकादायक ठरू शकते, असं फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री इन इंडियाचे महासंचालक राम कौदिन्य यांनी सांगितलं.