लडाखमध्ये भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असलेला चीन भारताला दुसऱ्या बाजुने घेरण्याच्या तयारीला लागला आहे. दोन दिवस पाकिस्तानात राहिल्यानंतर याच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे आज भारतात दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी पाकिस्तानला फायटर जेट, पाणबुडी आणि खतरनाक शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.
वांग यी यांनी आज एनएसए अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली. त्या आधी त्यांनी पाकिस्तानात मोठी डील केली आहे. चीनचे हा पाऊल भारताला दोन्ही बाजुंनी दबावात टाकणारे असल्याचे मानले जात आहे.
चीनला दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे. यामुळे चीनने पाकिस्तानला संरक्षण सहकार्य देण्याचे पाऊल उचलले आहे. हे अशावेळी झालेय जेव्हा अमेरिका आणि युरोप रशिया-युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये गुंतले आहेत. पाकिस्तानच्या आर्थिक संकटावर देखील मदत आणि बाहेर काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला चीनने संरक्षण सहकार्याचा भाग म्हणून पाकिस्तानला 6 J-10CE लढाऊ विमाने सुपूर्द केली. बुधवारी इस्लामाबादमधील पाकिस्तान दिनाच्या परेडमध्ये J-10CE जेट विमाने देखील होती, ज्यामध्ये पाकिस्तानने आपले लष्करी सामर्थ्य दाखवले. J-10CE हे 4.5-जनरेशनचे लढाऊ विमान आहे, जे क्षमतेच्या बाबतीत F-15 आणि F-35 स्टेल्थ फायटरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने चीनसोबत संयुक्तपणे विकसित केलेली किमान ५० नवीन JF-17 लढाऊ विमानेही सामील केली आहेत. यामुळे भारताची चिंता वाढणार आहे.
चीन पाकिस्तानचे नौदलही बळकट करत आहे. इस्लामाबादने अलीकडेच चीन निर्मित 054 फ्रिगेट समाविष्ट केले आहे, जे जमिनीवर, हवेत आणि पाणबुडीविरोधी युद्धासाठी डिझाइन केलेले आहे. पाकिस्तान चीनकडून पाणबुड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे. किमान चार पाणबुड्या चीनमध्ये बांधल्या जातील आणि उर्वरित पाकिस्तानमध्ये बांधल्या जातील.