लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मंगळवारी १९६२ च्या चिनी आक्रमणाचा उल्लेख करण्यापूर्वी ‘कथित’ हा शब्द वापरला आणि नंतर त्याबद्दल बिनशर्त माफीही मागितली. यावरून भाजपने मात्र काँग्रेसवर जोरदार टीका केली. व्हिडीओनुसार अय्यर एक किस्सा सांगताना म्हणाले, ‘ऑक्टोबर १९६२ मध्ये चिनी लोकांनी भारतावर कथित हल्ला केला.’ नंतर एका संक्षिप्त निवेदनात अय्यर म्हणाले, ‘चिनी हल्ल्यापूर्वी कथित शब्द चुकून वापरल्याबद्दल मी माफी मागतो.’
‘नेहरूज फर्स्ट रिक्रूट’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी हे भाष्य करून वाद ओढवून घेतला. त्यांच्या या शब्दप्रयोगाने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना सूट देण्यात यावी. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे.”
आयएफएस उच्च जातीची सेवा
पूर्वी आयएफएस ही ‘मेकॉलेच्या मुलांची’ उच्च जातीची सेवा मानली जात होती; परंतु आता ती अधिक लोकशाहीवादी बनली आहे. परराष्ट्र सेवेत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व दिसते आणि मला वाटते की, ही खूप चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसची ‘भारतविरोधी’ मानसिकता दर्शवते: भाजप
मणिशंकर अय्यर यांचे विधान काँग्रेसची भारतविरोधी मानसिकता दर्शवते आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव होत असताना शत्रुराष्ट्र निवडणुकांत हस्तक्षेप करीत असल्याचे संकेत यावरून मिळतात, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. अय्यर हे राहुल गांधींच्या संमतीशिवाय असे विधान करू शकणार नाहीत, असे सांगत त्यांनी खरगे यांच्या मौनाबद्दलही टीका केली.