गेल्या वर्षात संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत होतं. कोरोना संकटाची तीव्रता खूप जास्त होती. या परिस्थितीतही चीनच्या सीमावर्ती भागातील कुरघोड्या काही कमी होत नव्हत्या. गलवानच्या खोऱ्यात चीननंभारतीय जवानांवर हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या चकमकीचा व्हिडीओ चीननं शेअर केला आहे. मात्र त्याच व्हिडीओमुळे चीन तोंडावर पडला आहे.
चीनच्या टीव्ही चॅनलनं गलवान खोऱ्यातील संघर्षाचा ४५ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चिनी सैनिक भारतीय जवानांवर दगडफेक करताना अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. भारतीय जवान चिनी सैनिकांना प्रत्युत्तर देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ४५ सेकंदांचा व्हिडीओ जारी करून चीननं स्वत:चं हसं करून घेतलं आहे. चिनी सैनिक एका टेकडीवरून भारतीय जवानांवर दगडफेक करत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. आपल्या सैन्याचं साहस दाखवण्याच्या हेतूनं चीननं हा व्हिडीओ शेअर केला. चिनी सैन्य भारतावर भारी पडलं हे दाखवण्याच्या उद्देशानं चीननं व्हिडीओ प्रसिद्ध केला. मात्र या व्हिडीओनं चीनचा काळा कारनामा उजेडात आणला आहे.
चिनी चॅनलनं शेअर केलेल्या व्हिडीओत भारतीय जवान चीननं निगराणीसाठी उभारलेली चौकी उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. ही चौकी चिनी जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून उभारली होती. शेजारी राष्ट्रांच्या सीमेत घुसखोरी करून हळूहळू अवैध कब्जा वाढवत जायचा हे चीनचं धोरण आहे. गलवानमध्येदेखील चीननं तोच प्रयत्न करून पाहिला. मात्र भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत चीनचा डाव हाणून पाडला.
चीननं शेअर केलेल्या ४५ सेकंदांच्या व्हिडीओत गलवानच्या नदीत भारतीय जवान पाय रोवून उभे असल्याचं दिसत आहे. हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीच भारतीय जवान चिनी सैन्याच्या दगडफेकीला प्रत्युत्तर देत आहेत. या व्हिडीओत भारत आणि चीनचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकल्याचंही दिसत आहे. चिनी सैनिकांनी टेकडीवरून भारतीय जवानांच्या दिशेनं दगड भिरकावल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.