लेह, दि. 16 - डोकलामनंतर आता चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मंगळवारी ही घटना समोर आली आहे. भारतीय जवानांनी अटकाव केल्यानंतर चिनी सैनिकांनी दगडफेक केली, यालादेखील भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या घटनेत काही सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.
भारताच्या स्वातंत्र्यदिनीच चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकांनी सकाळी 6 आणि त्यानंतर 9 वाजता भारतीय सीमाभागातील ‘फिंगर फोर’ आणि ‘फिंगर फाइव्ह’ भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यापैकी ‘फिंगर फोर’ भागात प्रवेश करण्यात त्यांना यश आले. मात्र भारतीय जवानांनी अटकाव करत तत्काळ त्यांना माघारी घालवले. सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा प्रतिकार केला. अटकावापुढे काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हतबल चिनी सैनिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनीसुद्धा या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, दिल्लीतील लष्कराच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
आणखी बातम्या वाचा(सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका)(नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी)(आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी)
डोकलाम आणि सिक्कीममध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आल्यानंतर आता लडाखमध्येही अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे. ‘फिंगर फोर’ हा भाग आपला असल्याचं चीन दावा करत आहे. 1990च्या अखेरीस चर्चेदरम्यान भारताने या भागावर दावा केला होता. मात्र चीनने ‘फिंगर फोर’पर्यंत रस्ता बनवून हा अक्साई चीनचा भाग असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला चिनी सैनिक तलावाच्या उत्तर आणि दक्षिण काठाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता भारताने या भागात सशस्त्र पाहारा ठेवला आहे. अमेरिकेकडून निर्यात केलेली अत्याधुनिक यंत्रणा असलेली व 15 सैनिकांना वाहून नेणारी स्पीडबोटही इथे तैनात करण्यात आली आहे. यापूर्वी 2013 साली लडाखमधील देपसांग व दौलतबेग ओलडी या ठिकाणी चीनने केलेल्या घुसखोरीवेळीही या भागात तणाव निर्माण झाला होता.