नवी दिल्लीः लडाखमधील रक्तरंजित संघर्षानंतर भारत अन् चीनमधील वाद विकोपाला गेला आहे. चीननं आक्रमकपणा कायम ठेवल्यानं भारतानंही त्याला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. लडाखच्या LACवर भारतानं चीनला मागे जाण्यास भाग पाडलं असून, आक्रमक असलेल्या चीनची भारतासंदर्भात भूमिका अचानक बदलली आहे. भारत-चीनने पावले परस्पर लाभासाठी टाकावीत, असं भारतातले चिनी राजदूत सन विडोंग यांनी म्हणाले आहेत. भारत आणि चीनने परस्पर सहकार्याची अशी पावले उचलावीत, ज्यामुळे या दोघांना फायदा होईल. तसेच अशा गोष्टी करू नयेत ज्यामुळे दोघांना त्रास होईल. दोन्ही बाजूंना मान्य असणारा तोडगा काढण्यासाठी भारत-चीन सीमा विवाद शांततापूर्ण वाटाघाटीद्वारे सोडवावेत, असे निवेदन विडोंग यांनी दिले. चिनी राजदूत म्हणाले, भूतकाळातील सीमा विवाद हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. समान चर्चा आणि शांततापूर्ण वाटाघाटीद्वारे योग्य व तार्किक समाधान शोधणे आवश्यक आहे, जे दोन्ही देशांना मान्य असतील.'विडोंग यांनी आपल्या निवेदनाद्वारे भारत आणि चीनमधील मैत्रीपूर्ण संबंधांसाठी तीन सूचना केल्या आहेत. प्रथम भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार देश असले पाहिजेत. दुसरे म्हणजे भारत आणि चीनने संघर्ष नव्हे तर शांतता प्रस्थापित केली पाहिजे, तिसरे म्हणजे भारत आणि चीनने परस्पर हितसंबंध जोपासण्यासाठी पावले उचलायला हवीत, जेणेकरून दोघांनाही नुकसान होणार नाही. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या रक्तरंजित चकमकीवरही विडोंग यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, ही अशी परिस्थिती आहे जी भारत किंवा चीनला दोन्ही देशांना पाहायची नाही. कमांडर स्तरावरील चर्चेत झालेल्या कराराच्या आधारे आता आमच्या सैन्याने माघार घेतली आहे.भारतीयांमध्ये वाढत्या अविश्वासाची चीनला भीती?चीनच्या राजदूतानेही याची दखल घेतली की, गलवानमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांची फसवणूक केल्यानंतर भारतीयांचा चीनवर अविश्वास वाढला आहे. विडोंग यांनी नुकसानीच्या भीतीने चीननं केलेल्या कृत्यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलं आहे. ते म्हणाले, गलवान खोऱ्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनंतर भारतीयांच्या काही घटकांनी भारत-चीन संबंधांबद्दल चुकीची धारणा निर्माण करण्यास सुरुवात केली असून, दोन्ही नेत्यांमध्ये (भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग) यांच्यात झालेल्या सहमतीबद्दल शंका निर्माण झाली आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांना बाधा पोहोचत आहे.
India China FaceOff: भारताच्या पवित्र्यानं चीन घाबरला; म्हणे, परस्पर लाभासाठी भारत-चीनने पावले टाकावीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 7:57 AM