चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे उद्यापासून भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांना भेटणार असल्याचे समजते आहे. वांग यी अशा वेळी भारत दौऱ्यावर येत आहेत, जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दुसरीकडे गलवान घाटीमध्ये युद्धसदृष्य परिस्थिती बनल्यानंतर चीनचा बडा नेता भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर सारे ठीक राहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये यंदाा ब्रिक्स संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला मोदी उपस्थित राहू शकतात. गेल्या दोन वर्षांपासून संबंध ताणलेले असल्याने दोन्ही देशांचे नेते एकमेकांकडे गेले नव्हते. आता वांग यी भारतात येत असल्याने चीनने जयशंकर यांच्या दौऱ्याचे मार्ग मोकळे केले आहेत. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास उद्याच्या भेटीने मदत मिळणार आहे.
वांग यांच्या दौऱ्यानंतर सारे काही ठीक झाले तर मोदी देखील ब्रिक्स शिखर परिषदेला जातील. याचबरोबर तिथे रशिया-चीन आणि भारत यांच्यादरम्यान मोठी बैठक आयोजित होण्याची शक्यता आहे. वांग यी हे सध्या पाकिस्तानात आहेत. तिथे इस्लामिक देशांच्या संघटनेची इस्लामिक सहयोग संघटना ओआयसीची बैठक सुरु आहे. चीन जरी सदस्य नसला तरी पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. वांग यी भारतात येणार का याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतू जर ते आले तर २०१९ नंतर पहिलीच भेट असणार आहे.
पाश्चात्य देश अनेक प्रकारे भारताचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानच्या पंतप्रधानांशी झालेली भेट आणि ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी फोनवरील संवाद हा याच भागाचा भाग आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे की, भारताचे शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबित्व अशा वेळी होते जेव्हा अमेरिका या बाजारात उतरली नव्हती. पण आता त्याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. ही खूप वेगळी वेळ आहे. तो काळ आता बदलला आहे. गेल्या 25 वर्षांत भारतासोबतचे आमचे संरक्षण संबंध दृढ झाले आहेत.