लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सीमेवर भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संसदेत विरोधी पक्षांनी सरकारला दोन दिवसांच्या सत्रात घेरण्याचा प्रयत्न केला. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ‘मोदी सरकारच्या लाल डोळ्यांवर चिनी चष्मा चढला,’ असा टोला लगावला.
खरगे यांनी केंद्र सरकारला चीनच्या आक्रमकतेवरून प्रश्न केले आहेत. भारतीय संसदेत चीनविरोधात बोलण्यास परवानगी नाही का? मोदी सरकारच्या लाल डोळ्यांवर चिनी चष्मा चढला असे वाटते, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत संसदेत निवेदन दिले असले तरी तरीही विरोधी पक्ष या मुद्द्यावर चर्चेच्या मागणीवर ठाम आहेत. गुरुवारीही काँग्रेस खासदारांनी सभागृहात चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला, तर चीनने भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊनही चीनकडून भारताची आयात वाढत असल्याचा आरोप करत लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याप्रकरणी सभागृहात श्वेतपत्रिका मांडण्याची मागणी केली.
सदनात शून्य तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित करताना चौधरी यांनी सांगितले की, यापूर्वी दिल्लीच्या एम्सवर सायबर हल्ला झाला. चीनकडून हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. आपल्या सीमावर्ती भागात चकमक होते तेव्हा त्यावर आक्रमक भूमिका घेण्याऐवजी भारत सरकार शेजारील देशाशी आयात वाढवत आहे. सरकारचा हेतू काय आहे? आपले पंतप्रधान चीनला लाल डोळे कधी दाखवणार, असेही चौधरी म्हणाले. सभागृहात प्रत्येकी १५ मिनिटे आणि नंतर पुन्हा शून्य तासात दोन मिनिटे सभागृह तहकूब करण्यात आले.
सरकार पळ काढतेयn दरम्यान, काँग्रेसने गुरुवारी केंद्र सरकारवर भारत-चीन सीमेवरील वादविवाद टाळल्याचा आरोप करत मोदी सरकार या मुद्द्यापासून का पळत आहे, असा सवाल केला. n काँग्रेस प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी चीनबद्दल गप्प का आहेत, असे विचारत जेव्हा ते यावर बोलतात तेव्हा ते देशाला क्लीन चिट देतात, अशी टीका केली.