हैदराबाद – भारत आणि चीन यांच्यात गेल्या महिनाभरापासून लडाख सीमेवर तणाव सुरु आहे. अलीकडेच चीन आणि भारतीय सैन्यामध्ये चर्चा झाली. मात्र त्यात काही तोडगा निघाला नाही. यावरुन आता एआयएमआयचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारशी चीनसोबत काय चर्चा झाली? सरकार गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, सीमा विवादात भारत आणि चीनी सैन्य यांच्यात चर्चा झाली. चीनींसोबत काय चर्चा झाली हे केंद्र सरकारने देशाला सांगावे. त्यांनी लाजिरवाणं वाटत आहे का? ते गप्प का? लडाखमध्ये चीनी सैन्यांनी भारतीय हद्दीत कब्जा केला का? हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे असं ते म्हणाले.
पूर्व लडाखमध्ये जवळपास महिन्याभरापासून सीमेवर चीनच्या कारवाया संपत नाही, भारत आणि चीन सैन्य अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी एक बैठक झाली, त्यातही काही निष्पन्न झालं नाही. दोन्ही सैन्यांनी काही दिवसांपूर्वी सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली. पण दोन्ही देशांनी सध्याच्या परिस्थितीत समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुटनीती आणि सैन्यस्तरावर हालचाली सुरु ठेवल्या आहेत.
चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चायनीज आर्मी (पीएलए) च्या टाक्यांसह युद्ध अभ्यास करत असल्याचा व्हिडीओ जारी केला. ग्लोबल टाईम्सने सांगितले की, पीएलएचे चिनी सैनिक त्यांच्या सामान्य वाहनाची चाचणी घेत आहेत. पीएलएच्या या व्हिडिओमध्ये, चिनी सैनिक आपल्या टँकसह डोंगराळ भागात सराव करत आहेत. यापूर्वी सोमवारी लडाख सीमेवर सुरु असलेल्या तणावानंतर शनिवारी झालेल्या चर्चेनंतर चीनने दुटप्पी भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
भारत आणि चीन यांच्यात सीमेवरुन सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान चीनेने भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक तैनात केले आहे. चीनने हजारो सैनिकांसह अनेक टँक, बख्तबंद गाडी यांना लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)जवळ तैनात केले आहे. लष्करी व डिप्लोमेटिक लेवलवर चीनशी चर्चा यापुढे देखील सुरूच राहील असं परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. मात्र लडाखमधील सीमेवर दोन्ही देशांतील मोठ्या संख्येने सैन्य जमले आहे. त्यांना परत बोलावण्याबाबत काही निर्णय झाला की नाही हे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं नाही. परंतु सीमावादवरुन भारत आणि चीनधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात येत आहे.