चीनमध्ये सध्या लहान मुलं आजारी पडत आहेत. रुग्णालयात उपचारासाठी मुलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचं कारण म्हणजे तिथे एका नव्या आजाराची एन्ट्री झाली आहे. न्यूमोनिया या आजाराने मोठ्या संख्येने मुलं बाधित होत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याप्रकरणी चीनची चौकशी केली. याच दरम्यान, भारत सरकारही या आजाराबाबत सतर्क झाले आहे. या आजारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हा आजार भारतासाठीही धोकादायक ठरू शकतो का? त्याचा इथे परिणाम होईल का आणि झालाच तर सरकार किती तयार आहे? हे जाणून घेऊया...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटलं आहे की भारत चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. भारताला धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. पण चीनमध्ये ज्या वेगाने हा आजार मुलांमध्ये पसरत आहे त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे.
जगालाही याची चिंता आहे. कारण लहान मुलांचा हा आजार जर कोरोनासारखा जगात पसरला तर परिस्थिती किती धोकादायक असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. जगातील अनेक देश यासाठी अलर्ट झाले आहेत. लहान मुलांमधील रहस्यमयी न्यूमोनियामुळे भारत सतर्क आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात तापाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
DGHS च्या देखरेखीखाली आरोग्य मंत्रालयात बैठक झाली आहे. सरकारने सध्या कोणत्याही प्रकारची चिंता नाकारली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये एवियन इन्फ्लूएंझाची प्रकरणे आढळल्यानंतर भारतातील सिस्टमची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. हा आजार भारतात येण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, WHO ने चीनमधील वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे.
चीनकडे तपशीलवार माहितीसाठी अधिकृत विनंती केली आहे. मात्र, या प्रकरणी चीनने अद्याप कोणतंही उत्तर दिलेले नाही. इंटरनॅशनल मीडिया रिपोर्ट्स नमूद केलं आहे की, चिनी अधिकार्यांनी कोरोना निर्बंध हटवल्यामुळे आणि इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यांसारख्या रोगाच्या प्रसारामुळे या आजारात वाढ झाल्याचं कारण दिले आहे. ProMED नुसार, चीनमध्ये केवळ विद्यार्थीच आजारी नाहीत, तर अनेक शिक्षकांनाही न्यूमोनियाची लागण झाली आहे.