मुंबई : ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून गुंतवणुकीवर अवाजवी व्याज देण्याचे आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या ‘पॉवर ॲप’ कंपनीला दणका देत ईडीने त्यांच्या बँक खात्यातील ८ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम तसेच साडे बारा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि जुनागड येथे छापेमारी केली होती. ही ॲप कंपनी चिनी नागरिक चालवत असल्याची माहिती आता तपासादरम्यान पुढे आली आहे.
या प्रकरणी सर्वप्रथम उत्तराखंड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हे प्रकरण देशव्यापी असल्यामुळे तसेच या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचेही निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपासाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती.
या ॲपवरून गुंतवणुकीच्या विविध योजना सादर करण्यात आल्या होत्या. गुगल प्ले स्टोअरवरदेखील ही ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली होती. या ॲपवरून शेकडो कोटी रुपयांची रक्कम गोळा केल्यानंतर या कंपनीने पोबारा केला होता. या प्रकरणी ६ फेब्रुवारी २०२२ आणि १२ ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनीशी निगडित काही ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्या दोन्ही छाप्यांदरम्यान एकूण ६४ कोटी ३६ लाख रुपयांची बँक खात्यातील रक्कम जप्त केली होती. या प्रकरणी आतापर्यंत तीन लोकांना अटक करण्यात आली आहे.