नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) म्हणजे चिनी लष्कराला माहिती तंत्रज्ञानाच्या युगात क्षेत्रीय युद्ध जिंकण्याची सज्जता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. युद्धक्षमतेत वाढ करण्यासाठी जिनपिंग यांनी दिलेल्या या आदेशामुळे भारत-चीन सरहद्दीवरील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. वास्तविक, अशा प्रकारचे आदेश जिनपिंग यांनी चिनी लष्कराला देण्याची ही काही पहिलीच वेळ नसली तरी त्यातून पूर्व लडाखमधील चुमूरच्या टापूत आमने-सामने उभ्या ठाकलेल्या उभय देशांच्या सैन्याचा पारा चढण्याची दाट शक्यता आहे.रविवारी जिनपिंग यांनी पीएलएचे प्रमुख फँग यांच्यासह १५ वरिष्ठ जनरलना बीजिंगमध्ये बोलावून घेतले होते. सर्व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत सुरक्षा घडामोडींचे पुरते भान असायला हवे, अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली. बदलत्या काळानुरूप चीनची युद्धसज्जता पुरेशी नसल्याबद्दलची नाराजी त्यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे स्वच्छ शब्दांत व्यक्त केली. पूर्व लडाखच्या पट्ट्यात समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार ५०० फूट उंचीवर घुसखोरी करणारे चीनचे सुमारे एक हजार सैनिक गेले १२ दिवस तेथेच ठाण मांडून आहेत. तेथील एकूण स्थिती लक्षात घेता भारताने तेथे आणखी लष्करी कुमक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी त्यांचा तीन दिवसांचा भूतान दौरा रद्द केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)