इटानगर/कोलकाता : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील असापिला सेक्टरमधून २१ वर्षांच्या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप राज्यपालांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
अपहरण झालेले ठिकाण मॅकमोहन रेषेजवळ आहे. टोग्ले सिंगकाम आणि त्याचे दोन मित्र गमशी चादार आणि रोन्या नाडे हे टॅजिनच्या ना वंशाच्या परंपरागत मालकीच्या असलेल्या जमिनीवरील पारंपरिक वनौषधी गोळा करायला गेले होते. हा समाज काही प्रमाणात मासेमारीही करतो. १९ मार्चच्या सकाळी हे तीन मित्र मासेमारी करीत असताना चीनच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर दबा धरून हल्ला केला.
इतर दोन मित्र कसेतरी तेथून सुटले; परंतु टोंगले सिंगकाम याला चीनच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवून पळवून नेले. मॅकमोहन रेषा ही चीनचा स्वायत्त प्रदेश तिबेट आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सीमा आखते. अरुणाचल प्रदेश हा आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. मॅकमोहन रेषा ही व्यवस्थित आखलेली नसून लहान लहान सिमेंटचे खांब भारतीय बाजूने उभे केले गेले आहेत.