नवी दिल्ली, दि. 20 - भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा लडाखमधील घुसखोरीचा डाव स्वातंत्र्यदिनी उधळून लावला. चिनी सैनिकांना पिटाळून लावताना झालेल्या धक्काबुक्कीत आणि दगडफेकीत दोन्हीकडील लोक जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या धक्काबुक्की आणि दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडिायावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात भारत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओत 50 हून अधिक सैनिक दिसत आहेत. लडाख परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या व्हिडिओ संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक एकमेकांसमोर आले होते. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, चीनने हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.
चीन सैनिकांचा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. मात्र, असे काही घडल्याची आपणास माहिती नाही, अशी साळसूद भूमिका चीन सरकारने घेतली. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
लडाखचा फिंगर फोर भाग आपला असल्याचे दावा चीनने सुरू केला भारताने १९९0 झालेल्या चर्चेच्या वेळी त्या भागावर आपला दावा केला होता. मात्र, त्यानंतर फिंगर फोरपर्यंत रस्ता बनवून हा अक्साई चीनचा भाग असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चिनी सैनिक तलावाच्या उत्तर आणि दक्षिण काठाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, आता या भागात भारताचा सशस्त्र पहारा आहे. सिक्कीममधील डोकलाम भागात चिनी लष्कर रस्ता बांधत असताना भारतीय लष्कराने विरोध केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांत हाणामारी झाली होती. जवळपास 50 दिवसांपासून डोकलामचा हा तणाव सुरू आहे.
पाहा व्हिडिओ :