इटानगर- चीनच्या लष्करानं पुन्हा एकदा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास 10 दिवसांपूर्वी चिनी सैनिकांच्या एका तुकडीनं अरुणाचल प्रदेशच्या लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल(LAC)चं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी चिनी सैनिकांना परतण्याचा इशारा दिला. त्यानंतर चीनचे सैनिकही स्वतःच्या सीमेत परतले. दोन्ही देशांच्या नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आल्या आहेत.परंतु लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवरून भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. गेल्या वर्षी 2017 सालात दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध होते पण डोकलामचा वाद दोन्ही देशांसाठी परीक्षेचा काळ ठरला. 28 ऑगस्ट रोजी डोकलामवरुन निर्माण झालेला वाद संपुष्टात आला होता.दरम्यान, डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील वाद शमल्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, डोकलामध्ये चीनचे 1800 सैनिक तैनात होते. त्यामुळे कडाक्याच्या थंडी व बर्फवृष्टीत भारताला प्रथमच तिथे आपले सैन्य ठेवण्याची वेळ आली होती. एवढेच नव्हे, तर भारताने त्या भागातून आपले सैन्य कमी केल्यानंतर चीनने तिथे नवे रस्तेही बांधले आहेत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा चीनची घुसखोरी, भारतीय लष्कराच्या इंग्यानंतर ड्रॅगन ताळ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 4:29 PM