लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी सिक्कीममध्ये घुसखोरी करून भारतात प्रवेश केला असून सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या सैनिकांशी त्यांची धक्काबुक्कीही झाली असून चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांचे दोन बंकरही नष्ट केले आहेत.अधिकृत सूत्रांनुसार सिक्कीमच्या डोका ला भागात गेले १० दिवस चीनची ही आगळीक सुरू असून चिनी सैनिकांनी कैलास मानसरोवर यात्रेला निघालेली भारतीय यात्रेकरूंची एक तुकडीही अडवून ठेवली आहे. सूत्रांनी असेही सांगितले की, चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत आणखी आतपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी भारतीय सैनिकांना निकराचे प्रयत्न करावे लागले. डोका ला हे ठिकाण सिक्कीम, भूतान व तिबेटच्या सीमा जेथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी आहे. चिनी सैनिकांनी येथे सीमा ओलांडून अतिक्रण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतीय सैनिकांनी मानवी साखळी तयार करून चिनी घुसखोरांना मागे रेटण्याचाही प्रयत्न केला. ‘पीएलए’च्या काही सैनिकांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले आणि काही छायाचित्रेही काढली. याच घटनेत डोका ला भागातील लालटेन येथील दोन बंकर उद्््ध्वस्त केले गेले. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची २० जून रोजी ध्वजबैठकही झाली. तरीही तणाव निवळलेला नाही.
चिनी सैनिकांनी केली सिक्कीममध्ये घुसखोरी
By admin | Published: June 27, 2017 2:33 AM