लडाख: गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे. चिनी सैन्यानं त्यांची वाहनंदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानंदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. मात्र आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. चिनी सैन्यानं माघार घेतल्यानंतर काही भारतीय जवानदेखील मागे सरकले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यानंतर भारतानंही काही जवानांना माघारी बोलावलं.
भारताला मोठं यश; लडाखमध्ये चिनी सैन्याची अडीच किलोमीटरपर्यंत माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:26 PM