ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 25 - युद्धादरम्यान शत्रूसैन्याच्या तावडीत सापडणाऱ्या सैनिकांना अनंत यातना भोगाव्या लागतात. यातील बऱ्याच युद्धकैद्यांना परत मायभूमीत पाऊलही ठेवता येत नाही. 1962 च्या भारत-चीन युद्धात भारताविरुद्ध लढलेला आणि सध्या भारतात युद्धकैदी बनून राहत असलेला असाच एक चिनी सैनिक मायदेशात परतण्याची आस बाळगून आहे. त्यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत करण्याची विनंती केली आहे.
वँग ची असे या सैनिकाचे नाव असून, तो सध्या मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यात राहत आहे. 1962 च्या चीन युद्धात भारताविरुद्ध लढत असताना या सैनिकाला 1963च्या जानेवारी महिन्यात भारतीय रेड क्रॉसने पकडून भारतीय लष्कराच्या हवाली केले होते. त्यानंतर त्याला पुढील 6 वर्षे उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान .येथील वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. 1969 साली तुरुंगातून मुक्तता करण्यात आल्यानंतर त्याचे बालाघाट येथील तिरोडी गावात पुनर्वसन करण्यात आले. तेव्हापासून तो येथेच राहत आहे.
दरम्यान, 77 वर्षीय वॅग ची याला या भागात राज बहादूर या नावाने ओळखले जाते. तसेच येथे त्यांचे परिवारही आहे. मात्र वँग ची गेल्या 53 वर्षांपासून मायदेशात परतण्याची आस बाळगून आहे. चीनमध्ये त्याचे तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. अनेक प्रयत्नांनंतर 2013 साली त्याचा चिनी पासपोर्ट जारी झाला होता. पण अद्याप त्याला चीनमध्ये जाता आलेले नाही. "2014 पासून मी चीनमध्ये जाण्यासाठी भारत आणि चीन सरकारला विनवण्यात करत आहे. पण दोन्ही सरकारांनी माझ्या विनंतीची दखल घेतलेली नाही." असे वँग म्हणतो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून वँग याला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी चीनमध्ये जाऊन कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी आपणास द्यावी असे वँग म्हणतो.