ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 29 - अपेक्षेप्रमाणे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे नेतृत्व शशिकला नटराजन यांच्याकडे आले आहे. गुरुवारी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी एकमताने शशिकला नटराजन यांची निवड करण्यात आली. चेन्नईत सुरु असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकूण 14 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यात शशिकला यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे एकमताने मान्य करण्यात आले.
जयललिता यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी अशी शशिकला नटराजन यांची ओळख होती. अण्णाद्रमुकमध्ये त्यांना चिन्नाम्मा म्हटले जाते. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात जयललितांसोबत त्यांचा सावलीसारखा वावर होता. जयललिता हयात असेपर्यंत त्यांनी कधीही शशिकला यांना पक्षात किंवा सरकारमध्ये कुठलीही भूमिका दिली नाही.
मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णाद्रमुकच्या 23 नेत्यांनी शशिकला यांचे नेतृत्व मान्य करण्याचा प्रस्ताव मांडला. जयललिता यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करा तसेच संसदेत त्यांचा ब्रॉझ पुतळा उभारण्याची विनंती अण्णाद्रमुकने केली आहे.