अमेरिकन लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी चिनूक हेलिकॉप्टर अचानक ताफ्यातून काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे अशी १५ हेलिकॉप्टर वापरत असलेल्या भारतीय हवाई दलामध्ये खळबळ उडाली आहे. या हेलिकॉप्टरना आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय हवाई दलाने २०१९ मध्ये १५ चिनूक हेलिकॉप्टर सेवेत घेतली होती. ही हेलिकॉप्टर तोफा, रणगाड्यांसारखी अवजड सामुग्री लडाख, काश्मीरच्या दुर्गम भागात पोहोचविण्यास सक्षम आहेत. परंतू, अमेरिकेने तडकाफडकी ही हेलिकॉप्टर वापरातून बंद केल्याने खळबळ उडाली आहे. ही हेलिकॉप्टर जगभरातील अनेक देश वापरतात.
हवाई दलाने ही हेलिकॉप्टर बनविणाऱ्या बोईंग कंपनीकडे अधिक माहिती मागितली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले की भारतीय हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टर फ्लीट अजूनही कार्यरत आहे. अमेरिकेच्या लष्कराच्या चिनूक सीएच-47 हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा ज्या कारणांमुळे किंवा इंजिनला आग लागल्याने बंद पडला आहे, त्या कारणांचा तपशील भारताने मागवला आहे.
यूएस मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनला आग लागल्याने अमेरिकन सैन्याने CH-47 चिनूक हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा जमिनीवर आणला आहे. आग लागल्याने या हेलिकॉप्टर अपघातांत अद्याप जिवीतहानी झालेली नाही, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. आमच्या सैनिकांची सुरक्षा ही लष्कराची पहिली प्राथमिकता आहे, असेही ते म्हणाले.