केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी मोठं विधान केलं आहे. "मला माझ्या समाजातील लोकांना होत असलेला त्रास दिसला तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन" असं म्हटलं आहे. सोमवारी पक्षाच्या एससी-एसटी सेलने पाटणा येथील एसके मेमोरियल हॉलमध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभात चिराग पासवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
चिराग पासवान म्हणाले की, "मी कोणत्याही आघाडीत असलो, कोणतंही मंत्रीपद असो, ज्या दिवशी मला असं वाटेल की, संविधान आणि आरक्षणाशी खेळलं जात आहे, तेव्हा मी मंत्रिपदाचा त्याग करेन. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी एका मिनिटात मंत्रिपदाचा त्याग केला होता, त्याचप्रमाणे मीही एका मिनिटात मंत्रिपदाचा त्याग करणार आहे." पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त २८ नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर मोठी रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा चिराग पासवान यांनी मंचावरून केली.
चिराग यांनी पंतप्रधान मोदींचं केलं कौतुक
कार्यक्रमाला संबोधित करताना चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले की, लॅटरल एंट्रीमध्ये आरक्षणाबाबत आम्ही पंतप्रधान मोदींना सांगितलं की हे चुकीचं आहे आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. क्रीमी लेअरच्या मुद्द्यावरही पंतप्रधान म्हणाले की, हे लागू होणार नाही. यासाठी कोणी विरोध केला तरी आम्ही नेहमीच समाजातील लोकांसोबत चालत राहू, असं चिराग पासवान म्हणाले. सदैव समाजाची काळजी घेणाऱ्या आणि समाजासाठी लढणाऱ्या माझ्या वडिलांच्या मार्गावर मी चालत असल्याचं चिराग यांनी सांगितलं.
"मी सिंहाचा छावा, कोणापुढे झुकणार नाही"
चिराग यांनी काका पशुपती पारस यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. "काही अशी मानसिकता असलेले लोक आहेत ज्यांना चिराग पासवानला तोडायचं आहे. चिराग पासवान आपल्या समाजाला पुढे नेत आहे आणि म्हणून त्यांना मला संपवायचं आहे. वडिलांचे विचार पुढे घेऊन जात आहे हे त्यांना पटत नाही, पण ज्यांना मला तोडायचं आहे ते हे विसरतात की, मी सिंहाचा छावा आहे. मी कोणापुढे झुकणार नाही. मी कोणाला घाबरत नाही" असं चिराग यांनी म्हटलं आहे.