पाटणा : अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारण्यासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याचे काम सुरू आहे. अनेक राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांपासून राम मंदिर उभारणीसाठी देशवासी उत्स्फुर्त आणि यथाशक्ती देणगी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत राम विलास पासवान यांचे चिरंजीव आणि जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी राम मंदिर उभारणीसाठी एक लाखांची देणगी दिल्याची माहिती मिळाली आहे. (chirag paswan donated one lakh 11 thousand rupees for construction of ram mandir)
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी देणगी देणारे चिराग पासवान दुसरे गैर भाजप खासदार ठरले आहेत. चिराग पासवान यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट करून राम मंदिरासाठी देणगी दिल्याची माहिती दिली आहे. चिराग पासवान यांनी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या पदाधिकाऱ्यांकडे ०१ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश राम मंदिर उभारणीसाठी देणगी म्हणून सुपुर्द केला.
मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने दिले राम मंदिरासाठी ११ लाख; कारसेवकांबद्दल मोठे वक्तव्य
माझ्याकडून खारीचा वाटा
सोशल मीडियावर धनादेशाचा फोटो शेअर करत चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी माझ्याकडून खारीचा वाटा म्हणून छोटेसे योगदान दिले आहे. श्रीराम आणि शबरी माता यांच्यातील अपार स्नेहसंबंध समाजाने स्मरणात ठेवावा. शबरी मातेचा वंशज असल्याचा अभिमान आहे, असे चिराग पासवान यांनी नमूद केले. अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी सर्वांनी आपले कर्तव्य म्हणून काही ना काही योगदान आणि सहभाग नोंदवावा, असे आवाहनही चिराग पासवान यांनी यावेळी केले.
दरम्यान, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या मंदिर उभारणीत सक्रिय सहभागी होत पाच लाख रुपयांची देणगी दिली. डोंबिवली येथील गणेश मंदिरचे विश्वस्त मधुकर चक्रदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक, प्रदीप पराडकर यांचेकडे पाच लाख रुपयांचा धनादेश डॉ. शिंदे यांनी सुपूर्द केला. फुल ना फुलाची पाकळी या स्वरुपात मलाही राममंदिर उभारणीच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी दिली.