Chirag Paswan Joins NDA : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू असून, विरोधकांच्या खेळीला उत्तर देण्यासाठी एनडीएकडूनही बैठकीचे आयोजन करण्यात आले. यातच आता माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. "२०२४ मध्ये NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल", असा विश्वास चिराग पासवान यांनी यावेळी व्यक्त केला.
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या भेटीनंतर एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. NDA मध्ये सहभागी झाल्यानंतर एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना चिराग यांनी म्हटले, "एनडीएमध्ये सर्व काही ठीक आहे. बराच काळ चर्चा सुरू होती. आम्हाला काही चिंता होत्या आणि त्यावर चर्चा झाली असून अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. आमचा भाजपासोबत करार झाला आहे. तसेच आमचे उद्दिष्ट आहे की, २०२४ ची लोकसभा आणि २०२५ मध्ये बिहारमध्ये एनडीएचे सरकार असेल. मी हाजीपूरमधून निवडणूक लढणार आहे."
दरम्यान, बिहारचे लोक 'महागठबंधन' स्वीकारत नाहीत. २०२४ मध्ये NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल आणि २०२५ मध्ये बिहारमध्ये NDA सरकार स्थापन होईल. मी हे नक्कीच सांगू शकतो की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) उमेदवार हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवेल, असेही चिराग पासवान यांनी सांगितले.
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या भेटीनंतर एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. चिराग पासवान यांची दिल्लीत भेट झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो, असे ट्वीट जेपी नड्डा यांनी केले आहे. याशिवाय मंगळवारी होत असलेऱ्या एनडीएच्या बैठकीतही चिराग पासवान हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.