चिराग पासवान यांचा भाजपला घरचा आहेर; राहुल-अखिलेश यांच्या मागणीला समर्थन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 19:23 IST2024-08-25T19:22:31+5:302024-08-25T19:23:22+5:30
Chirag Paswan on Caste Census : चिराग पासवान यांच्या मागणीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

चिराग पासवान यांचा भाजपला घरचा आहेर; राहुल-अखिलेश यांच्या मागणीला समर्थन...
Chirag Paswan on Caste Census : देशात गेल्या काही काळापासून जात जनगणनेचा मुद्द्याने जोर पकडला आहे. विरोधक सातत्याने जात जनगणनेची मागणी करत आहेत. अशातच, केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनीदेखील जात जनगणनेची मागणी केली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून जात जनगणनेची मागणी करत आहेत. त्यांनी अनेकदा यावरुन भाजपवर टीका केली आहे. आता भाजपसोबत असलेल्या चिराग पासवान यांनीदेखील हीच मागणी केली आहे. म्हणजेच, त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल आणि अखिलेश यांच्या मागणीला समर्थन दिले आहे.
लोजपा (रामविलास) च्या कार्यकारिणीची बैठक
लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी रांचीमध्ये बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जात जनगणनेच्या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट करताना चिराग पासवान म्हणाले की, "माझ्या पक्षाने जात जणगणनेच्या समर्थनार्थ आपली भूमिका नेहमीच स्पष्ट ठेवली आहे. जात जनगणना व्हावी, अशी आमची इच्छा आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना राबवतात, त्यामुळे योग्य व्यक्तीला त्याचा फायदा मिळण्यासाठी आणि त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडे ही माहिती असणे आवश्यक आहे."
यापूर्वीही अनेक मुद्द्यांवर वेगळी मते मांडली
चिराग पासवान यांनी यापूर्वीही जात जनगणनेबाबत असेच मत व्यक्त केले आहे. किंबहुना केवळ जातगणनेलाच नव्हे, तर इतर अनेक बाबी आणि मुद्द्यांवर त्यांनी भाजपच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. अलीकडेच चिराग पासवान यांनी केंद्र सरकारच्या लॅटरल एंट्रीविरोधात वक्तव्य केले होते. याबाबत विरोधी पक्षांनी आधीच सरकारला धारेवर धरले होते, परिणामी केंद्र सरकारने ही भरती प्रक्रिया मागे घेतली.