Chirag Paswan, Kangana Ranaut Slap: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत कंगनाने हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून विजय मिळवला आणि पहिल्यांदा खासदार झाली. खासदार झाल्यानंतर ती विमानतळावर गेली असताना महिला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर ( Kulwinder Kaur ) हिने तिला कानशिलात लगावली. कंगनाने काही महिन्यापूर्वी केलेल्या एका विधानाबद्दल मनात असलेल्या रागापायी त्या महिलेने हे कृत्य केल्याचे सांगितले. घडलेल्या प्रकारानंतर सर्वच स्तरातून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. कंगनाचा को-स्टार आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चंदीगड विमानतळावर हा प्रकार घडला असून या घटनेचा अनेकांनी निषेध केला. चिराग पासवान यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. "कंगनाच्या बाबतीत जे घडले ते चुकीचे आहे. मी किंवा कोणीही या घटनेचे समर्थन करू शकत नाही. तुमचा मुद्दा मांडण्यासाठी तुम्ही असा विचित्र मार्ग स्वीकारणे योग्य नाही. तुम्ही एखाद्या समोर आपले मत मांडण्यासाठी त्याला शिवीगाळ करू शकत नाही किंवा त्यांना मारहाण करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, तो आपले मत मांडू शकतो. सीआयएसएफ महिलेची भावना मी समजू शकतो, तिची आई आंदोलनाला बसली होती त्यामुळे हे ऐकून तिला नक्कीच वाईट वाटले असेल. पण ती आपले मत नीट शब्दात मांडू शकली असती," असे मत चिराग पासवान यांनी डीएनएशी बोलताना व्यक्त केले.
चिराग पासवान हे राजकारणात येण्याआधी चित्रपटसृष्टीत अभिनय करत होते. त्यांनी कंगना राणौतसोबत एक चित्रपटही केला होता. तो चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर चिराग पासवान यांनी राजकारणात गांभीर्याने लक्ष घातले. चिराग पासवान यांनी अलीकडेच बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर चिराग पासवान यांनी मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली.