नवी दिल्ली - लोक जनशक्ति पार्टीचे (Lok Janshakti Party) नेते चिराग पासवान (Chirag Paswan) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चिराग हे त्यांचे वडील स्वर्गीय रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत असताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. चिराग पासवान नाटक करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. मात्र चिराग यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
"वडिलांच्या निधनाने किती दुःखी झालो, हे आता सिद्ध करावं लागेल का?" असं म्हणत चिराग यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "वडिलांच्या निधनाने किती दु: खी झालो हे मला नितीश कुमार यांच्यासमोर सिद्ध करावं लागेल का, माझ्याकडे काय पर्याय आहे. ऐन निवडणुकीत प्रचार सुरू असताना वडिलांचं निधन झालं. मी रोज शूटिंग करतोय" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
"वडिलांच्या निधनानंतर फक्त सहा तासांत आपल्याला पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी द्यावी लागणार होती. पक्षाची सर्व कामं मलाच पूर्ण करावी लागणार आहेत. 10 दिवस आपल्याला घराबाहेर पडता येणार नव्हतं. डिजिटल प्रचारासाठी व्हिडीओ शूट करावा लागणार होता" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. एलजेपीने चिराग यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एक निवेदन जारी केलं आहे. चिराग पासवान आपल्या 'बिहारी फर्स्ट, बिहार फर्स्ट' या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे व्हिडिओ शूट करत आहेत. हा व्हिडिओ त्याचाच असल्याचं म्हटलं आहे.
"जेडीयू नेते पराभवाच्या भीतीने अत्यंत खालच्या पातळीवर आले आहेत"
"नितीश कुमारांना आता त्यांच्या पराभवावर विश्वास बसू लागला आहे. पक्षाला निवडणूक लढवायची आहे, मग व्हिडिओ शूट तर होणारच ना. जेडीयू नेते पराभवाच्या भीतीने अत्यंत खालच्या पातळीवर आले आहेत. हा व्हिडीओ पक्षाचा जाहीरनामा लाँच करण्यासाठी शूट करण्यात आला आहे आणि यावर आक्षेप का असावा? नितीश कुमारांना जनता उत्तर देईल आणि ते या पदावरून पायउतार होणं निश्चित आहे" असं जेडीयूने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस; "तो" Video व्हायरल
वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांचा प्रॅक्टिस करतानाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. चिराग पासवान नाटक करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. व्हिडीओमध्ये चिराग हे रामविलास पासवान यांच्या फोटो समोर उभे राहून भाषणाची तयारी करत होते. चिराग यांच्या आजुबाजूला कॅमेरामन आणि इतर काही लोकं होती. त्यांना ते काही सूचना करत होते. काही ओळी म्हटल्यानंतर ते पुढे काय म्हणायचं ते विसरले आणि पुन्हा शूट करण्यास सांगू लागले.