लोक जनशक्ती पार्टीचे खासदार चिराग पासवान यांनी भाजपा खासदार कंगना राणौतसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना सांगितलं की, मी तिला संसदेत शोधत होतो. दोघांचीही बॉलिवूडपासूनच चांगली मैत्री आहे, पण गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना भेटू शकत नव्हतो, त्यामुळे तिला भेटायचं होतं असं म्हटलं.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चिराग पासवान य़ांनी कंगना राणौतसोबतच्या मैत्रीसोबतच त्यांच्या राजकीय आणि बॉलिवूड प्रवासाबद्दलही सांगितलं. ते म्हणाले की, "कंगना चांगली मैत्रीण आहे. बॉलिवूडमध्ये काही होवो किंवा न होवो. माझी कंगनासोबत चांगली मैत्री नक्कीच झाली आहे. ती चांगली गोष्ट होती. मी भेटण्यासाठी तिला संसदेत शोधत होतो. गेल्या २-३ वर्षांपासून मी खूप व्यस्त होतो कारण कनेक्शन तुटलं होतं."
"बहुतेक वेळा ती पॉलिटिकली करेक्ट नसते, पण ती ज्या पद्धतीने बोलते आणि कुठे काय आणि कधी बोलायचे हे तिला माहीत असतं. आता ती पॉलिटिकली करेक्ट आहे की नाही यावर वाद होऊ शकतो, पण ही तिची यूएसपी आहे आणि त्यामुळेच ती आपल्या सर्वांना आवडते."
आपल्या बॉलीवूड प्रवासाबद्दल बोलताना चिराग पासवान म्हणाले की, "तो काळ वेगळा होता. अवघड की सोपं माहीत नाही, पण तो काळ वेगळा होता. माझ्या कुटुंबातील कोणीही बॉलिवूडमध्ये आलेलं नाही आणि माझ्या सात पिढ्यांचा चित्रपटांशी काहीही संबंध नाही. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी माझी पहिली पिढी होती, पण लवकरच मला समजलं की ही एक आपत्ती आहे. देशाला हे कळण्याआधीच माझ्या लक्षात आलं की मीच आपत्ती ओढवून घेत आहे."
"मी वडिलांना स्टेजवर उभं राहून लांबलचक भाषण करताना पाहिलं होतं. मला एका ओळीतले डायलॉग दिले जायचे आणि मी दोन पानाचं बोलायचो. असं बोलायचं नाही हे ते मला सांगायचे. मग मला लवकर लक्षात आलं की, असा मेकअप करणं आणि डायलॉग पाठ करणं ही गोष्ट मी करू शकत नाही. तुम्ही मला पाहिलं असेल की मी संसदेत किंवा रॅलीत बोलतो तेव्हा वाचून कधीच बोलत नाही. त्या क्षणी माझ्या मनात जे येईल ते मी बोलतो" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.