केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना रणौतच्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील वक्तव्याव प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते आणि बलात्कार तसेच हत्या होत होत्या, असे वक्तव्य कंगना रणौतने केले होते.
झी न्यूजच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' संमेलनात चिराग पासवान म्हणाले, कंगना माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती एक मजबूत इच्छाशक्ती असलेली महिला आहे. यावर माझा पूर्णविश्वास आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपने कंगनाच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे.
काय म्हणाले चिराग? -चिराग पासवान म्हणाले, "कंगनाची स्वतःची मतं आहेत आणि ते व्यक्त करण्यास ती कधीही मागेपुढे बघत नाही. आपण तिच्या विचाराशी नक्कीच सहमत अथवा असहमत असू शकता. मात्र, आज ती राजकारणात आहे. यामुळे त्यांनी पॉलिटिकल लाइन घेताना विचार करायला हवा. पण, मी यात हस्तक्षेप करणार नाही. कारण हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे."
बिहारचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहे? -या प्रश्नावर चिराग पासवान म्हणाले, "मी बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्टची लढाई लढत आहे. मला बिहार विकसित राज्य बनवायचे आहे. भलेही ते मी बनवेल अथवा कुणी इतर बसून ती धोरणे राबवेल." उत्तर प्रदेशात काका-पुतण्या एक झाले. बिहारमद्ये एक होतील का? यावर चिराग म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांसोबतच्या आघाडीत तर आम्ही आहोतच. मी आघाडीत माझे म्हणणे मांडू शकतो."