नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण यांनी केलेला जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने फेटाळून लावला. या अर्जाला ईडीने न्यायालयात विरोध केला. ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, सदर प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात चित्रा रामकृष्ण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी आहेत. त्यावर न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी सांगितले की, आरोपी चित्रा रामकृष्ण यांनी केवळ एनएसई कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले नाही तर एनएसईच्या निधी व मालमत्तेचाही गैरवापर केला आहे.फोन टॅपिंगप्रकरणी ईडीने चित्रा रामकृष्ण यांना १४ जुलैला अटक केली होती. को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मे २०१८ मध्ये तक्रार नोंदविली होती. एनएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याशिवाय फोन टॅपिंग प्रकरणात आयसेक कंपनी ४.५४ कोटी रुपये कमावू शकली नसती, असे विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी म्हटले आहे. याआधी एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना न्यायालयाने जामीन नाकारला होता.
चित्रा रामकृष्ण यांचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 7:32 AM