नवी दिल्ली - भाजपच्या आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राजधानी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भेट घेतली. ऑक्टोबर महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्या. त्यामध्ये, चित्रा वाघ यांनाही संधी देण्यात आली होती. त्यामुळे, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची वाघ यांनी भेट घेतली.
भाजपची 80 जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे. त्यामध्ये भाजपकडून चित्रा वाघ यांना बढती मिळाल्याचं दिसून आलं. राज्याच्या राजकारणात सातत्याने विरोधकांची भूमिका जोरदारपणे निभावत असल्याने, तसेच विविध प्रश्नांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत असल्याने वाघ यांनी राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली. राज्यातून यापूर्वी पंकजा मुंडे या देशाच्या राजकारणात भाजपचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्यानंतर चित्रा वाघ पहिल्यांदाच भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटल्या. या भेटीत आगामी होणाऱ्या निवडणुकांवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच ही प्रोत्साहनपर भेट नववर्षात अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. नववर्ष परिवर्तनाची पहाट घेऊन येणारं असेल…., असेही वाघ यांनी म्हटलं.
चित्रा वाघ आक्रमक दिसल्या
चित्रा वाघ ह्या गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये सर्वाधिक आक्रमक महिला नेत्या असल्याचं दिसून येतं. सत्ताधिऱ्यांना थेट भिडण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. आदिवासीमंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील प्रकरणात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातूनच, राठोड यांना मंत्रीपद सोडावे लागले. तसेच, राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांच्यावरील आरोपातही त्या आक्रमकपणे राष्ट्रवादीविरोधात पुढे आल्या होत्या. चित्रा वाघ यांच्या या कार्याची दखल घेऊन, देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती झाल्याचे समजते.