देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. चित्रकूटमध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांना तंत्र-मंत्र आणि कोरोनाच्या भीतीमुळे जवळपास 4 वर्षे घरात कैद करून ठेवल्याची घटना घडली आहे. घरात हवा येऊ नये म्हणून सर्व दारं आणि खिडक्या बंद केल्या होत्या. गुरुवारी मुलांची मावशी व मामा आले असता कुलूप बंद पाहून ते चिंतेत पडले. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने चाइल्डलाइनला माहिती दिली. चाइल्डलाइन टीमने मुलं आणि त्यांच्या आईची सुटका केली.
चित्रकूट चाइल्डलाइनला माहिती मिळाली की, कर्वी कोतवाली भागातील तरुणाच्या दुर्गाकुंजमध्ये राहणाऱ्या काशी केशरवानी यांनी पत्नी पूनमसह त्यांची दोन मुले रजत आणि हर्षिता यांना घरात कैद केलं आहे. तो मुलांना घराबाहेर पडू देत नाही आणि अभ्यास करू देत नाही. माहिती मिळताच चाइल्डलाइन टीम घटनास्थळी रवाना झाली. घराचे कुलूप उघडले असता अंधाऱ्या खोलीत आई व दोन्ही मुले बसल्याचे दिसून आले. यासोबतच तंत्र-मंत्राचे बरेच साहित्य पडून होते. खोलीत खूप अस्वच्छता होती.
मुलांची अवस्था फारच वाईट होती. पोलिसांनी सर्वांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले. प्रत्येकजण मानसिक आजारी असल्याचं येथील डॉक्टरांनी सांगितलं. मुलांना पाहून असं वाटते की त्यांनी अनेक दिवस अंघोळ केली नाही आणि त्यांना पोटभर जेवणही मिळाले नाही. चाइल्डलाइन टीमने सांगितले की, आधी काशी यांनी घराचे कुलूप उघडण्यास नकार दिला. खूप समजावून सांगून आणि प्रयत्नानंतर कुलूप उघडून पोलीस पथक आत शिरले आणि कसेबसे मुलांना आणि आईला बाहेर काढले. काही वर्षांपूर्वीपर्यंत काशी यांचा व्यवसाय चांगला चालला होता.
कोरोनापूर्वी हे कुटुंब खूप समृद्ध आणि सुखी होतं पण नंतर असं काही झालं ज्यामुळे सर्वकाही बदललं. व्यवसाय ठप्प झाला, त्यांची मुलगीही आजारी पडू लागली. यानंतर त्यांनी एका मांत्रिकाच्या तंत्रमंत्राची प्रक्रिया सुरू केली. कोरोनाच्या काळात काशी यांनी त्यांचा मुलगा रजत, मुलगी हर्षिता आणि पत्नी पूनम यांना घराबाहेर पडू दिले नाही आणि कोणालाही भेटू दिले नाही. नातेवाईक यायचे तेव्हा घराचे दरवाजे बंद पाहून परत जायचे. त्यावेळी मुलगी हर्षिता आठवीत तर मुलगा रजत हा चौथीत शिकत होता, मात्र दोघांचाही अभ्यास चार वर्षापासून थांबला आहे. त्यानंतर आता चाइल्ड लाईन टीमने कशीतरी कुटुंबाची सुटका केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.