Calcutta HC Judge Chittaranjan Das: काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या संबंधांवरूनही आगपाखड करताना दिसतात. तर न्यायपालिकेवरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत असतात. अशातच पश्चिम बंगालच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो, असे सांगताना पुन्हा संघात सक्रीयपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास निवृत्त झाले. दास यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून न्या. चित्तरंजन दास यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना चित्तरंजन दास यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा स्वयंसेवक असल्याबाबत सांगितले.
राष्ट्रभक्ती आणि कामाप्रति निष्ठा शिकलो
चित्तरंजन दास यांनी निवृत्त होताना केलेल्या समारोपाच्या भाषणामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सांगितले. काही लोकांना हे आवडणार नाही, परंतु, येथे हे कबूल केले पाहिजे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो. त्या संघटनेला खूप काही देणे लागतो. माझ्या बालपणापासून आणि संपूर्ण युवावस्थेत संघात होतो. धाडसी, प्रामाणिक आणि इतरांबद्दल समानता बाळगण्यास संघाकडून शिकलो, त्याशिवाय राष्ट्रभक्ती आणि कामाप्रति निष्ठा शिकलो. असे असले तरी न्यायाधीश म्हणून काम करताना ३७ वर्षांच्या काळात आपण संघापासून दूर राहिलो, असेही चित्तरंजन दास यांनी स्पष्ट केले.
पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे
संघाच्या सदस्यत्वाचा वापर करून प्रगती केली नाही. कारण ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे. सगळ्यांना समान वागणूक दिली, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, साम्यवादी असो किंवा भाजपचा, काँग्रेसचा किंवा तृणमूल काँग्रेसचा सदस्य असो. दोन सिद्धांतांवर न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता निवृत्त झाल्यामुळे जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोणत्याही मदतीसाठी किंवा कामासाठी बोलावले, जे मी करण्यास सक्षम असेन, तर नक्कीच संघटनेसाठी पुन्हा एकदा काम करण्यासाठी तयार आहे, अशी इच्छा चित्तरंजन दास यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी गेल्या १४ वर्षांपासून उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. कोलकाता उच्च न्यायालयात येण्यापूर्वी ते ओडिसा उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ओडिसाचे रहिवासी असलेल्या चित्तरंजन दास यांनी १९८६ मध्ये शिक्षण पूर्ण करून वकिली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अतिरिक्त सत्र आणि जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते ओडिसा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.