मुंबई - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच कायदा बदलावरुन राजकारण करणे चुकीचे आहे. कारण, हा कायदा बनविण्यासाठी संसदेत सर्वच राजकीय पक्षांचे मतदान घेण्यात आले होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच लहान मुलांच्या हातात दिलेले चॉकलेट परत घेता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.
अॅट्रॉसिटी अॅक्टमधील संशोधनाविरुद्ध सवर्ण समाजातील नागरिकांनी गुरुवारी भारत बंदचा नारा दिला होता. तसेच दिल्ली राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंदोलनही केले होते. त्यामुळे सुमित्रा महाजन यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टच्या बदलावरुन राजकारण करु नये, असे म्हटले आहे. तसेच याबाबत एक उदाहरणही त्यांनी दिले. समजा, जर मी माझ्या मुलाच्या हातात एक चॉकलेट दिले, पण काही वेळानंतर मला लक्षात आले की, एकाच वेळेस त्याने एवढे मोठे चॉकलेट खाणे योग्य नाही. त्यामुळे, जर तुम्ही त्या मुलाच्या हातातून चॉकलेट वापस घेण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही ते वापस घेऊ शकत नाहीत. तुम्ही ते चॉकलेट वापस घेतल्यास, तो मुलगा रागाला येईल आणि रडेल, असे उदाहरण सुमित्रा महाजन यांनी दिले. तर, दोन-तीन समजूतदार लोकांनी सांगितल्यास तो मुलगा चॉकलेट परत देईल, असेही महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, अॅट्रॉसिटी अॅक्टसंदर्भातील कायदा हा संसदेतच बनविण्यात येतो. मात्र, सर्वच खासदारांनी मिळून अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये केलेल्या बदलांबाबत विचार करणे गरजेचे आहे.