जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 06:21 AM2024-06-12T06:21:07+5:302024-06-12T06:21:31+5:30
Kerala High Court: आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या प्रकरणात केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तिरुअनंतपुरम - आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या प्रकरणात केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याचवेळी कोर्टाने मुलीला वडिलांच्या ताब्यातून बाहेर काढा, अशा सूचनाही दिल्या आहेत. याचिकाकर्त्या तरुणाचा धर्म वेगळा असल्याने मुलीच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता.
उच्च न्यायालयाने तरुणीला तिच्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही. आणि न्यायमूर्ती पी.एम. मनोज यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्ता जर्मनीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेला विद्यार्थी आहे. प्रकल्प अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे नाते जोडले गेले होते, असा दावा त्याने केला आहे.
विशेष बाब...
तरुण वेगळ्या धर्माचा आहे यावर मुलीच्या वडिलांचा आक्षेप होता. यानंतर मुलीला वडिलांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे, असे याचिकेत म्हटले होते. विशेष बाब म्हणजे न्यायालयाने मुलगी, तिचे वडील आणि याचिकाकर्त्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलून माहिती मिळवली होती.
मुलीचा काय आरोप?
२७ वर्षीय तरुणीने सांगितले की, वडिलांनी तिला तिच्या इच्छेविरुद्ध ताब्यात ठेवले होते. तिने याचिकाकर्त्यासोबत राहण्याची इच्छाही व्यक्त केली होती. यादरम्यान न्यायालयाने शाफीन जहाँ विरुद्ध अशोकन के.एम. प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला.
कोर्टाने म्हटले की, कायद्याचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या निवडीचा आदर केला पाहिजे. आई-वडिलांचे प्रेम किंवा काळजीमुळे मुलीला तिचा जोडीदार निवडताना रोखता येणार नाही.