नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्ल्या, रामदेव बाबा यांच्यासह ५० बड्या सहेतूक कर्जबुडव्यांचे ६८,६०७ कोटी रुपयांचे कर्ज भारतीय बँकांनी तांत्रिकदृष्ट्या माफ केले, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली. माहिती अधिकारात अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसने यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी आरबीआयकडे अर्ज दाखल करून सहेतूक ५० बडे कर्जबुडवे व १६ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्याकडे थकीत कर्जाचा तपशील मागितला होता. बँकेचे केंद्रीय माहिती अधिकारी अभय कुमार यांनी २४ एप्रिल रोजी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आल्याचे गोखले यांनी म्हटले आहे.आरबीआयने दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे की, ही बँकांची थकबाकी रक्कम ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत तांत्रिकदृष्ट्या/सारासार विचाराअंती बुडीत खात्यात टाकली होती. पण अहवालाच्या पहिल्या आवृत्तीतील ही चूक आता दुरुस्त केली आहे.>कर्जबुडवे आणि कंपन्यांची नावेसहेतूक ५० बड्या कर्जबुडव्यांच्या यादीत मेहुल चोक्सी आणि त्यांच्या कंपन्या अग्रस्थानी आहेत. चोक्सी हे सध्या अॅन्टीगुआ आणि बार्बाडोस आयएल्सचे नागरिक आहेत, तर त्यांचे भाचे आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये आहेत. दुसऱ्या यादीत आरईआय अॅग्रो कंपनी आणि कंपनीचे संचालक, विनसम डायमंड अॅण्ड ज्वेलरी, रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याशी संबंधित रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड (इंदूर), झूम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ग्वाल्हेर), विजय माल्ल्या यांची बंद पडलेली किंगफिशर एअरलाइन्स, कुडोर केमी (पंजाब), अहमदाबादस्थित फॉरेव्हर प्रिसियश ज्वेलरी अॅण्ड डायमंडस् प्रा. लिमिटेडचा समावेश आहे.>३० हून अधिक कंपन्यांचा समावेशथकीत कर्जबुडव्यांच्या यादीत ३० हून अधिक कंपन्या आहेत. विशेष म्हणजे ५० बड्या कर्जबुडव्यांपैकी ६ जण हिरे, सोन्याच्या दागदागिन्यांच्या कंपन्यांशी संबंधित आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला वित्त मंत्री निर्मला सीतारामण आणि राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर देण्यास नकार दिल्याने मी हा अर्ज दाखल केला होता, असे गोखले यांनी सांगितले.>सरकार सत्य का दडवत होते? - राहुल गांधीसरकार कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी लोकांकडे देणगी मागत आहे, तर दुसरीकडे कर्ज बुडवून बँकांची लूट करणाऱ्यांचे कर्ज माफ करीत आहे. हे सत्य उघड होऊ नये म्हणून सरकारने संसदेत व बाहेर चलाखी केली. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या खुलाशाने सरकारचा खोटारडेपणाच उघड झाला आहे. अखेर सरकार हे सत्य का दडवत होते? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. संसदेत ५० बड्या कर्जबुडव्यांची नावे विचारुनही वित्तमंत्र्यांनी उत्तर देण्यास नकार दिला होता. आता रिझर्व्ह बँकेने नीरव मोदी, मेहूल चोक्सीसह भाजपाच्या मित्रांची नावे सहेतूक कर्जबुडव्यांच्या यादीत टाकली आहेत, असे त्यांनी टिष्ट्वट केले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी कर्जाच्या रकमेसह कर्जबुडव्यांच्या नावांचा तपशीलही जनतेसमोर जाहीर केला आहे.
चोक्सी, रामदेव बाबांसह बड्या मंडळींचे ६८ हजार कोटी केले माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:19 AM