कुत्र्याच्या हल्ल्यात चौशिंगा हरणाचा मृत्यू कुसुंबा शिवारातील घटना : वनविभागामार्फत अंत्यसंस्कार
By admin | Published: June 23, 2016 9:34 PM
जळगाव : कुसुंबा शिवारात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गुरुवारी सकाळी चौशिंगा प्रजातीचे दुर्मीळ हरिण गंभीर जखमी झाले. वन्यजीव संरक्षक संस्थेचे पदाधिकारी तसेच वनविभागाच्या कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या हरिणाचा मृत्यू झाला.
जळगाव : कुसुंबा शिवारात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गुरुवारी सकाळी चौशिंगा प्रजातीचे दुर्मीळ हरिण गंभीर जखमी झाले. वन्यजीव संरक्षक संस्थेचे पदाधिकारी तसेच वनविभागाच्या कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या हरिणाचा मृत्यू झाला.कुसुंबा शिवारात गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी चौशिंगा प्रजातीच्या हरिणाचा पाठलाग करीत जखमी केले. ही बाब आजूबाजूच्या नागरिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मोकाट कुत्र्यांपासून हरणाचे संरक्षण केले. गंभीर जखमी असलेल्या या हरिणाचे प्राण वाचविण्यासाठी नागरिकांनी वन्यजीव संरक्षक संस्थेचे वासुदेव वाढे यांच्याशी संपर्क साधला. वाढे यांनी याबाबत साहाय्यक उपवनसंरक्षक डी.आर.पाटील यांना याबाबत माहिती दिली. गंभीर जखमी असलेल्या या हरिणावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. वनपाल एस.टी.भिलावे यांनी पंचनामा करून या हरिणाचे अहिंसा तीर्थ गो-शाळेच्या परिसरात अंत्यसंस्कार केले.चौशिंगा प्रजातीचे हरिण हे दुर्मीळ मानले जाते. इंग्रजीत या हरिणाला फोर हॉर्न ॲटीलोब म्हटले जाते. यावल वनविभागात या प्रजातीच्या हरिणाचा संचार असल्याचे वन्य अभ्यासक अभय उजागरे व गणेश सोनार यांनी यापूर्वी नोंद केली आहे. पाण्याच्या शोधार्थ हे हरिण या भागात आले असावे असा अंदाज वासुदेव वाढे यांनी व्यक्त केला आहे.