भोपाळ - मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर बंदी आणत असताना या जाहिरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जाहिराती भाजपाविरोधात चौकीदार चोर है अशी मोहीम उघडली होती. या अंतर्गतच मध्य प्रदेश काँग्रेसकडून जाहिरात बनवण्यात आल्या होत्या. यात दोन ऑडीओ आणि १ व्हिडीओ स्वरुपाच्या जाहिरातींचा समावेश होता. या जाहिरातींमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाना साधण्यात आला आहे.
काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या जाहिरातींविरोधात मध्य प्रदेशातील भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. १६ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील भाजपाचे शिष्टमंडळांने निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. चौकीदार चोर है माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेसचा डाव आहे असं तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने केलेल्या चौकशीनंतर निष्पन्न झालं की, सध्याच्या राजकारणात चौकीदार या शब्दाचा अर्थ भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला गेला आहे. राजकीय जाहीरात करताना कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक आरोप लावू शकत नाही या कारणाने निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे. त्याचसोबत चौकीदार चोर है या मोहीमेशी निगडीत कोणत्याही प्रचार साहित्याचा वापर काँग्रेसने करु नये असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
चौकीदार चोर है ही काँग्रेसची मोहीम भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने भारतीय जनता पार्टीनेही मै भी चौकीदार ही मोहीम हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार या मोहीमेतंर्गत ट्विटवर नरेंद्र मोदी नावाच्या पुढे चौकीदार नरेंद्र मोदी असा उल्लेख केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री, भाजपा पदाधिकारी यांच्यासोबत अनेकांना सोशल मिडीयात आपल्या नावापुढे बदल करत चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी आपली नावं बदलली. इतकचं नाही तर मै भी चौकीदार या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद कार्यक्रम हाती घेत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मै भी चौकीदार माध्यमातून चर्चा केली.