इंदूर : मध्य प्रदेशच्या इंदूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये 'चौकीदार चोर है' चे स्टिक चिकटवल्याने रेल्वे पोलिसांनी काँग्रेसच्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी ट्रेनच्या आत आणि बाहेरील बाजुला हे स्टिकर चिकटवल्याचा आरोप आहे.
आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव विवेक खंडेलवाल आणि शहर काँग्रेस समितीचे प्रवक्ता गिरीश जोशी यांच्याविरोधात रेल्वे कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर स्थानकावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या दोन्ही बाजुला वादग्रस्त स्टिकर चिकटवल्याचा संशय आहे.
आरपीएफने या प्रकाराचे व्हिडिओ फुटेजही पाहिले आहे. मात्र, या स्टिकर्सवर कुठेही भाजपा किंवा त्यांच्या नेत्यांचे फोटो नव्हते. तर या स्टीकरवर 'देश का चौकीदार चोर है।' असे लिहिलेले होते. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्या फोटोसह पक्षाचे चिन्ह आणि लढाऊ विमानाचा फोटो छापलेला होता. तसेच यावर विवेक खंडेलवाल आणि गिरीश जोशी यांची नावे आणि फोटोही छापण्यात आले होते.
देशात लोकसभेची आचारसंहिता असताना हे स्टिकर चिकटविण्यात आले आहेत. यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत कळविले असून त्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे, असे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरु असल्याचेही ते म्हणाले.