ख्रिश्चन समाजातील आई वडिलांनी त्यांच्या मुलींचं लग्न वयाच्या २४ वर्षाआधीच करण्याचा अजब सल्ला भारतीय जनता पार्टीच्या केरळमधील स्थानिक नेत्याने दिला आहे. लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी समाजाला हा इशारा दिला. केरळमधील भाजपा नेते पीसी जॉर्ज हे याआधीही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते त्यातून जॉर्ज यांच्या अटकेचीही मागणीही करण्यात आली होती.
मिडिया रिपोर्टनुसार, पूंजार येथील माजी आमदार जॉर्ज यांनी ख्रिश्चन समाजातील लोकांना त्यांच्या घरातील मुलींची लग्न २४ वर्ष होण्याआधी करून टाकावीत असं म्हटलं. पाला येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, मीनाचिल तालुक्यात जवळपास ४०० युवती लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. त्यातील केवळ ४१ युवती परत आल्यात. ख्रिश्चन समाजातील पालक त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी वयाच्या २५ वर्षापर्यंत वाट पाहतायेत त्यामुळे हे घडतंय असा दावा त्यांनी केला.
तर मुलींची लग्न २४ व्या वयाआधी करावीत. त्या लग्नानंतरही शिक्षण घेऊ शकतात असा सल्ला पीसी जॉर्ज यांनी पालकांना दिला आहे. मुलींची लग्न वयाच्या २५, ३० पर्यंत का केली जात नाहीत, का त्यांना घरात बसवले जाते? २५ वर्षाची एक मुलगी काल बेपत्ता झाली. रात्री ९.३० वाजता ती गायब झाली असं सांगत २५ वयापर्यंत मुलींचं लग्न न झाल्यास त्यासाठी वडिलांना जबाबदार धरलं पाहिजे. त्यांनी तिचं लग्न का केले नाही, हा असा मुद्दा आहे ज्यावर बोलले पाहिजे असं पीसी जॉर्ज यांनी म्हटलं. जॉर्ज यांच्या विधानावरून युवक काँग्रेसने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
'द केरल स्टोरी' सिनेमा सापडला होता वादात
दरम्यान, २०२३ मध्ये द केरल स्टोरी नावाचा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात केरळातील युवतींची कहाणी समोर आणली होती ज्यांना बळजबरीनं धर्मांतरण करण्यास भाग पाडलं जाते. या चित्रपटावरून बराच वादंग झाला होता. या सिनेमाविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल झाली होती.