ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि 11 - अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी 3600 कोटींच्या व्यवहारात अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरुन आश्चर्याचा धक्काच बसला आहे. परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (Foreign Regional Registration Office) मिळालेल्या माहितीनुसार अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी मध्यस्थी करणारे ख्रिश्चन मायकल यांनी 2005 ते 2013 दरम्यान 180हून अधिक वेळा भारताचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. मायकल यांनी दिल्लीमध्ये जास्त वेळा दौरा केला आहे.
मायकल यांनी नोंदणी कार्यालयात दिलेल्या माहितीनुसार संपर्क साधण्यासाठी अभिनव त्यागी यांचे नाव दिले होते. याव्यतिरिक्त त्यांचे सहकारी जे बी सुब्रहमण्यम यांच्याही नावाची नोंद आहे. सुब्रहमण्यम मिडिया एक्सिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक होते. मायकल यांनीच या कंपनीची स्थापना केली होती.
अभिनव त्यागी यांचा त्यागी कुंटुंबियांशी काही संबंध आहे का ? याची तपासणी तपासयंत्रणा करत आहेत. त्यागी कुटुंबाला मायकल यांच्याकडून लाच मिळाल्याचा आरोप आहे. सीबीआय आणि ईडी मायकल यांच्या भारत दौ-यांची तपासणी करत आहे. यामध्ये 2012 -13 मध्ये केलेल्या दौ-यांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. कारण याचवेळी इटलीमधील तपासयंत्रणांनी भ्रष्टाचार प्रकरणावरुन तपासाला सुरुवात केली होती. संरक्षण मंत्रालयानेदेखील हे प्रकरण सीबीआयकडे सोपवून तपास करण्याचे आदेश दिले होते.
भारतामध्ये तपासाला सुरुवात झाल्यानंतर मायकल यांनी पळ काढला ते पुन्हा परतलेच नाहीत. सध्ये ते युएईमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना अटक करण्यासाठीची विनंती सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आधीच पाठवलेली आहे.
'8 ते 9 वर्षात 180 दौरे यामुळे नक्कीच आश्चर्य वाटत आहे. मायकल यांनी नेमक्या कोणाच्या भेटी घेतल्या याची माहिती आम्ही मिळवत आहोत. दिल्लीमधील पंचतारांकित हॉटेल्समध्ये त्यांनr वास्तव्य केलं आहे. तसंच सफदरजंग येथे त्यांचं घर आहे ज्याची किंमत 1.2 कोटी आहे जी जप्त करण्यात आली आहे', अशी माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.
काय आहे प्रकरण:
- VVIP असलेले 12 अगुस्ता वेस्टलँड AW101 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार 2013 मधे युपीए सरकारच्या काळात झाला.
- तब्बल 36 अब्ज रुपयांची खरेदी होणाऱ्या ह्या व्यवहारात अनेक अटींची पूर्तता झाली नाही – उलट हा करार अगुस्ता वेस्टलँडच्याच खिशात पडावा म्हणून अनेक गोष्टी घडवून आणल्या गेल्या, अनेक मंत्री, सैन्य अधिकारी इत्यादींनी यासाठी मोठी लाच घेतली असा आरोप आहे.
- 25 मार्च 2013 रोजी, तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार घडल्याची कबुली दिली आणि त्यावर सीबीआयमार्फत जलद कारवाई सुरु असल्याचं देखील सांगितलं.