ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलासा देत पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाच शिवाय जागतिक पातळीवर पाकिस्तानची नाचक्कीही झाली. यामुळे बिथरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा कुरापती करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा रेषेवर भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे.
पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ आपल्या बॉर्डर एक्शन टीमचे (BAT) कमांडो तैनात केले आहेत. याद्वारे भारतीय जवानांवर वारंवार विघातक हल्ले करुन जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणे हा त्यांचा उद्देश आहे. दरम्यान, यापूर्वीही पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमचा भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात समावेश राहिला आहे.
"टाइम्स नाउ" या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीममध्ये केवळ सैन्यचं नाही तर दहशतवाद्यांचाही समावेश आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषा आणि विशेष करुन हाजी पीर परिसराजवळ भारतीय जवानांना टार्गेट करण्याचं कटकारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात येत आहे.
कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगित देण्यात आली. यामुळे तिळपापड झालेल्या पाकिस्तानकडून भारतीय जवानांना निशाणा बनवण्यासाठी कट रचला जात आहे. 17 आणि 18 मे रोजी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी भारताकडून झालेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी एसएसजी कमांडो मारला गेला. एलओसी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कमांडो पाकिस्तानने सीमारेषेवर का तैनात केले आहेत? याचा तपास करताना ‘बॅट’ची ही भयावह बाब समोर आली आहे.