राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आणखी एक विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. येथे एमए पास असलेल्या तरुणीने केमिस्ट्री लेक्चरसोबत लग्न न करता पिकअप ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह केला आहे. पिकअप चालक असलेला तरुणीचा प्रियकर हा फक्त बारावीपर्यंत शिकला आहे. मुलगी एग्रीकल्चर सुपरवायजर स्पर्धेची तयारी करत आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला आहे. नातेवाईकांनी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली.
एसपी कार्यालयात पोहोचलेल्या तारानगरच्या 24 वर्षीय पार्वती शर्माने सांगितले की, सिरसला गावात राहणाऱ्या 32 वर्षीय योगेंद्र शर्मासोबत तिने स्वत:च्या इच्छेने प्रेमविवाह केला होता. तरुणीने सांगितले की, ती योगेंद्रला गेल्या 8 वर्षांपासून ओळखते. योगेंद्रचे तारानगर येथे नातेवाईक आहेत. तो तिच्या शेजारी राहतो. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही फोनवर बोलू लागले. पार्वतीने या दोघांच्या नात्याबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगितलं पण त्यांनी आपली मुलगी गरीब घरात देणार नाही असं सांगून संबंध ठेवण्यास नकार दिला.
पार्वतीच्या म्हणण्यानुसार, तिला लग्नासाठी अनेक मुलांनी मागणी घातली. पण प्रियकर योगेंद्रसमोर त्यासर्व गोष्टी निरर्थक वाटत होत्या. तिने ही सर्व नाती नाकारली. 7 जुलै 2023 रोजी ती योगेंद्रसोबत पळून गेली. नंतर दोघेही नौरंगसर येथील योगेंद्रच्या बहिणीच्या घरी गेले. तेथे काही दिवस राहून तारानगरला परतले. तारानगरला येताच मंदिरात जाऊन लग्न केले. पार्वती घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तारानगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली.
पार्वती स्पर्धेचा फॉर्म भरायचा असल्याचं सांगून घरातून निघून गेली होती, पण ती परत आली नाही, असं म्हटलं आहे. पार्वतीच्या नातेवाईकांना तिच्या प्रेमविवाहाची माहिती मिळताच ते संतप्त झाले. त्यांनी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पार्वती आणि योगेंद्र यांनी पोलीस अधीक्षकांकडे जाऊन संरक्षण मागितलं. पार्वतीने सांगितले की, तिने बीएससीनंतर राज्यशास्त्रातून एमए केलं आहे. तीन भावंडांमध्ये ती सर्वात लहान आहे. योगेंद्रने सांगितले की, त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. आता तो पिकअप चालवतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.