हरीश गुप्ता, नवी दिल्लीराज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात चुरस सुरू झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पंजाबमधून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सिब्बल यांना आपल्या राज्यातून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठविण्यात रस दाखविला असला तरी हिमाचलमधून आनंद शर्मा यांना उमेदवारी देण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल असल्याचे समजते.सध्या राज्यसभेवर राजस्थानमधून निवडून आलेले शर्मा येत्या जुलैमध्ये निवृत्त होत आहेत; पण आता राजस्थानमधून राज्यसभेच्या चारपैकी एकही जागा जिंकण्यासारखी काँग्रेसची स्थिती नाही. त्यामुळे राज्यसभेतील पक्षाचे आघाडीचे नेते असलेले व गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे शर्मा दीर्घ कालानंतर पुन्हा एकदा हिमाचल या आपल्या मूळ राज्यातून राज्यसभेवर जातील. सध्या हिमाचलमधून निवडून आलेल्या भाजपच्या बिमला कश्यप निवृत्त होत आहेत. तेथील विधानसभेतील विद्यमान पक्षीय बलाबलानुसार यावेळी भाजपला एक जागा कमी निवडून आणता येईल व ती काँग्रेसच्या वाट्याला जाईल.काँग्रेसचे राज्यसभेतील तब्बल २१ सदस्य यावेळी निवृत्त होत असून, विविध राज्य विधानसभांमधील पक्षीय बलाबल पाहता यापैकी फक्त ११ जागा पुन्हा जिंकणे काँग्रेसला शक्य होईल. मणिशंकर अय्यर व डॉ. भालचंद्र मुणगेकर हे दोन नामनिर्देशित सदस्यही निवृत्त होत आहेत. हे दोघे नेमणूक झााल्यानंतर काँग्रेसमध्ये सामील झाले होते. पंंजाबमधील राज्यसभेच्या तीन जागा स्वत:कडेच कायम राखण्याच्या स्थितीत काँग्रेस आहे. पंजाबमधून राज्यसभेच्या एकूण सात जागांची निवडणूक व्हायची आहे. त्यापैकी अंबिका सोनी आपली जागा कायम ठेवू शकतील, हे नक्की दिसत आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये चुरस
By admin | Published: February 08, 2016 3:21 AM