विकास झाडे
नवी दिल्ली : सरतेशेवटी प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, ही रॅली रिंग रोडवर न काढता पाच सीमांवरून काढली जाईल आणि त्याच ठिकाणी परत येईल, अशी माहिती शेतकरी नेत्यांनी दिली. रविवारी या रॅलीचे मार्ग ठरविण्यात येतील. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी राजपथावर संचलन सुरू असेल, तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांची रॅली निघाल्याचे चित्र पाहायला मिळेल. रॅलीची जोरदार तयारी सुरू असतानाच शेतकऱ्यांनी एका संशयित हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रॅलीत चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून व्यत्यय आणण्याचा कथित कट रचला असा संशय आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या पोलिसांसोबत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शहाजापूर, सिंघू, सिकरी आणि गाझीपूर सीमेवरून टॅक्टर रॅली काढण्याची परवानगी दिली आहे. ही रॅली दिल्लीच्या दिशेने काही किलोमीटर अंतर येईल, पुन्हा परत त्याच ठिकाणी जाईल. या निर्णयामुळे शेतकरी आणि पोलिसांमधील चर्चा फलदायी ठरली आहे.
शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचा कट उधळला शेतकऱ्यांनी शुक्रवारी रात्री सिंघू सीमेवर एका संशयित हल्लखोराला पकडले आहे. आंदोलनात अडथळा आणण्याचा कट रचला असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. रॅलीच्या वेळी चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून व्यत्यय आणण्याचा कथित कट त्याने रचला असा संशय आहे. हा तरुण माध्यमांसमोर म्हणाला, आम्हाला यासाठी शस्त्रे मिळाली होती. २६ तारखेला शेतकरी पुढे जायचे थांबले नाहीत तर त्यांना गोळी घालण्याचा आदेश होता. दहा जणांच्या दुसऱ्या पथकाने मागून गोळीबार केला असता. यामुळे दिल्ली पोलिसांना असे वाटेल की, शेतकऱ्यांनीच हे केले आहे. संशयिताने म्होरक्याचे नाव प्रदीप सिंग असे असल्याचे व तो पोलीस विभागात असल्याचे सांगितले आहे. या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तो सोनीपत येथील निवासी आहे. शेतकऱ्यांनी दबाव आणून असे बोलायला सांगितले होते, असे त्याचे म्हणणे आहे.