- एस. के. गुप्तानवी दिल्ली : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) शुक्रवारी दहावी (आयसीएसई) व बारावीचे (आयएससी) निकाल जाहीर केले. यावर्षी दहावीत ९९.३४ टक्के व बारावीत ९६.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. काऊन्सिल सचिव गॅरी अराथून यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे बारावीच्या ८ विषयांची व दहावीच्या ६ विषयांची परीक्षा यंदा होऊ शकली नाही.आज जाहीर करण्यात आलेले निकाल एका विशेष फॉर्म्युल्यानुसार जाहीर करण्यात आले आहेत. ज्या विषयांची परीक्षा झाली, त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारावर ज्या विषयांची परीक्षा झाली नाही त्या विषयांना गुण दिले आहेत. दहावी, बारावीत यंदा प्रथमच कोणीही टॉपर नाही. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेच्या रचनेत कसलाही बदल करण्यात आलेला नाही. ज्याप्रमाणे मागील वर्षीची गुणपत्रिका होती, तशीच या गुणपत्रिकेची रचना आहे.दहावीत यंदा २,०७,९०२ विद्यार्थांपैकी २,०६,५२५ विद्यार्थी पास झाले आहेत. यातील १,१२,६६८ म्हणजेच ५४.१९ टक्के विद्यार्थी व ९५,२३४ म्हणजेच ४५.८१ टक्के विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. बारावीतील ८८,४०९ पैकी ८५,६११ विद्यार्थी पास झाले आहेत. यात ४७,४२९ म्हणजे ५३.६५ टक्के विद्यार्थी व ४०,९८० म्हणजेच ४६.३५ टक्के विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे गॅरी अराथून यांनी अभिनंदन केले.महाराष्ट्रातून दहावीत यंदा २३,३३६ विद्यार्थ्यांपैकी २३,३१९ जण पासमहाराष्ट्रातून दहावीत यंदा २३,३३६ विद्यार्थ्यांपैकी २३,३१९ जण पास झाले आहेत. यात १२,७४७ म्हणजे ५४.६२ टक्के विद्यार्थी व १०,५८९ म्हणजेच ४५.३८ टक्के विद्यार्थिनी पास झाल्या आहेत.बारावीत यावर्षी ३,१५० पैकी ३,१०४ जण पास झाले आहेत. यात १,४७० म्हणजे ४६.६७ टक्के विद्यार्थी व १,६८० विद्यार्थिनी म्हणजेच ५३.३३ विद्यार्थिनी पास झाल्या आहेत.कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी वाट पाहावी लागली. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांचा हा महत्त्वाचा टप्पा होता. त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. विद्यार्थी निकाल सीआयएससीईच्या वेबसाईटवर पाहू शकतात, असेही काऊन्सिल सचिव गॅरी अराथून यांनी सांगितले.
सीआयएससीई दहावी, बारावीचे निकाल जाहीर, दहावीत ९९ टक्के व बारावीमध्ये ९६ टक्के विद्यार्थी पास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 4:53 AM