Parliament News: एकीकडे भाजपा एनडीएसह सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा संसदेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे. बनावट आधार कार्डाच्या माध्यमातून तीन जण संसदेत घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र, सीआयएसएफच्या जवानांनी या तीन जणांना पकडून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या फ्लॅप गेटवर पास तपासणीदरम्यान CISF जवानांनी कासिम, मोनिस आणि शोएब या तीन मजुरांना पकडले. हे तिघे बनावट आधार दाखवून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. ते तीन मजूर डीव्ही प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीचे असल्याची माहिती तपासात उघड झाली. हे तीन मजूर आयजी ७ मध्ये एमपीच्या लाउंजच्या बांधकामासाठी आले होते. पुढील तपासासाठी या मजुरांना संसद मार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
या तिन्ही मजुरांवर भारतीय दंड संहितेची बनाव आणि फसवणुकीची विविध कलमे लावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तीन मजूर त्यांचे आधारकार्ड दाखवून संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सीआयएसएफच्या जवानांना त्यांचे आधारकार्ड संशयास्पद वाटले. आधार कार्ड तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले.
यानंतर संसद भवनाच्या सुरक्षेसाठी तैनात अन्य सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या तीनही मजुरांची कसून चौकशी केली. या तिघांनी आधार कार्ड कधी, कुठे आणि कसे बनवले, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी संसदेच्या लोकसभा सभागृहात घुसखोरी करण्यात आली होती. त्यावेळेस सभागृहातील बाकांपर्यंत पोहोचून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला होता.