सातारा, दि. 6 - दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा 'नॅशनल हायवे क्रमांक चार' सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला जात असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे ते बेंगलोर दरम्यानच्या चार शहरात गोळ्या झाडून केली गेलेली हत्या पाहता 'हायवे'शी संबंधित हा योगायोग म्हणायचा की सुनियोजित कट, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
चार वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात पाठीमागून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात शेवटपर्यंत खरे खुनी सापडलेच नाहीत. दाभोलकर हे मूळचे साता-याचे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या सातारा शहरातील नागरिकांना चार वर्षांनंतरही दाभोलकर हत्येच्या वेदना लपविता आलेल्या नाहीत.
त्यानंतर कोल्हापूर येथे ‘शिवाजी कोण होता ?’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांचीही सकाळी फिरायला गेल्यानंतर गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. त्या प्रकरणातीलही खरे खुनी समाजासमोर अद्याप आलेले नाहीत. विशेष म्हणजे, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच कोल्हापूर शहर आहे. पानसरे यांच्या खुनाची चर्चा अजून विरली नाही, तोच धारवाड येथे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही गोळ्या झाडूनच खून करण्यात आला. धारवाड हे शहरही पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच वसले आहे.
या तीन खुनांची दहशत देशभर माजलेली असतानाच मंगळवारी बेंगलोर येथे पत्रकार गौरी लंकेश यांचीही गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. पुण्यातून निघालेला हायवे क्रमांक चार बेंगलोरमध्ये समाप्त होतो. त्यामुळे दाभोलकरांच्या रुपात पुण्यातून सुरू झालेली हत्येची मालिका बेंगलोरमध्ये संमाप्त झाली, असे म्हणायचे की, यापुढेही डागाळलेला हा हायवे रक्ताळलेलाच दिसणार..याची भीतीयुक्त चर्चा साता-यात सुरू झाली आहे.