शहरांत भाजपा, गावांत काँग्रेस, दोन्ही पक्षांत असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:46 AM2017-12-04T02:46:40+5:302017-12-04T02:47:02+5:30

महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातच्या दक्षिणेकडील वलसाड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील शहरी भागांत भाजपा, तर ग्रामीण भागांत काँग्रेस असे चित्र आहे.

In the cities BJP, dissent at both the Congress and the Congress | शहरांत भाजपा, गावांत काँग्रेस, दोन्ही पक्षांत असंतोष

शहरांत भाजपा, गावांत काँग्रेस, दोन्ही पक्षांत असंतोष

Next

संदीप प्रधान
वलसाड : महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातच्या दक्षिणेकडील वलसाड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील शहरी भागांत भाजपा, तर ग्रामीण भागांत काँग्रेस असे चित्र आहे. भाजपा व काँग्रेसमध्येही असंतोष असून धरमपूरची जागा काँग्रेसकडून खेचण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत येथील पाचपैकी वलसाड, पारडी व उंबरगाव हे तीन मतदारसंघ भाजपाच्या पारड्यात गेले होते, तर धरमपूर व कपराडीमध्ये काँग्रेस विजयी झाली होती. भरत पटेल (वलसाड), ईश्वर पटेल (धरमपूर), जितू चौधरी (कपराडा), कनू देसाई (पारडी), रमण पाटकर (उंबरगाव) या पाचही विद्यमान आमदारांना दोन्ही पक्षांनी पुन्हा उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात नवे चेहरे रिंगणात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत सहा तालुका पंचायतींपैकी प्रत्येकी तीन भाजपा व काँग्रेसने जिंकल्या. पाचही नगरपालिकांवर भाजपाचा झेंडा असून, एका जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपाची सरशी झाली. नोटाबंदीनंतर लागलीच झालेल्या वापी नगरपालिका निवडणुकीत ४४ पैकी ४१ जागांवर भाजपा विजयी झाली होती.
वलसाडमधील पाच मतदारसंघांतील निवडणुकीवर भाजपा व काँग्रेसमधील असंतोषाचे सावट आहे. वापी नगरपालिकेचे माजी अध्यक्ष हार्दिक शहा, जिल्हा बँकेचे संचालक राजू राठोड, नगिनभाई पटेल व किरणबेन पटेल हे भाजपातील स्थानिक नेते तिकीट वाटपावर नाराज असल्याने पक्षाच्या उमेदवारांच्या मार्गात अडथळे आणत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी समज देऊनही वलसाडमधील पक्षांतर्गत असंतुष्ट थंड झालेले नाहीत, असे पक्षाचे कार्यकर्तेच सांगतात.

सिरॅमिकचा व्यवसाय करणारे राहुल शिसोदिया म्हणाले की, जो पक्ष वलसाड जिंकेल, तोच गुजरातवर राज्य करेल, हे येथील समीकरण आहे. सरकारच्या धोरणांमुळे सिरॅमिकचा धंदा मंदावला आहे. आगाऊ पैसे देऊन व्यवहार करावे लागत असल्याने आणि लेबरचा खर्च जराही कमी झालेला नसल्याने आर्थिक संकट आहे, पण भाजपाला स्वीकारणे ही वलसाडमध्ये मजबुरी आहे. मोदी स्वत: भ्रष्ट नसले, तरी गुजरात सरकारमधील मंत्र्यांबाबत न बोललेले बरे. घड्याळाची शोरूम चालविणारा तरुण नीलेश म्हणाला की, नोटाबंदी, जीएसटीशी लोक हळूहळू जुळवून घेत आहेत. दुसरा पर्यायच नाही. मागील वर्षी दिवाळीत आमचा घड्याळांचा जुना स्टॉकही विकला गेला होता. यंदा दिवाळी खूप खराब गेली. टेलरिंगचा व्यवसाय करणारे प्रजापती म्हणाले की, काँग्रेसकडे राज्यात प्रभावी नेतृत्व नाही, हीच या पक्षाची मोठी समस्या आहे.

बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा
वलसाड, पारडीच्या शहरी भागातील व्यापारी दुकानदार यांच्याशी संवाद साधला असता, नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आदी मुद्द्यांमुळे लोकांमध्ये असलेली नाराजी स्पष्ट जाणवली. मात्र, शहरी भागांत काँग्रेसकडे सक्षम पर्याय नसल्याने व मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार नसल्याने भाजपाला स्वीकारणे अपरिहार्य आहे. 1धरमपूरमधून ईश्वर पटेल यांना उमेदवारी दिल्याने
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किसनभाई पटेल नाराज आहेत.
गौरव पंड्या यांच्या शिफारशीवरून झालेल्या तिकीटवाटपाला किसनभार्इंचा विरोध होता.
2किसनभार्इंना हाताशी धरून धरमपूरची जागा
आपल्याकडे खेचण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. रस्त्यात एक सरकारी प्राथमिक शाळा लागली. तेथील शिक्षकांना भेटलो. ते म्हणाले की, राजकारणात पडणे
किंवा बोलणे आम्हाला वर्ज्य आहे.
3 आदिवासी पट्ट्यातील काँग्रेसकडील एक जागा खेचण्याचे भाजपाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत, हे खरे. कपराडात काँग्रेसच्या जितू चौधरी यांना पराभूत करण्याकरिता वलसाडचे भाजपा खासदार के. सी. पटेल हे आपली सून उषा पटेल यांनी रिंगणात उतरावे, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने मधुभाई राऊत यांना भाजपाने उमेदवारी दिली.

Web Title: In the cities BJP, dissent at both the Congress and the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.