नवी दिल्ली: जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसक आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या साकेत न्यायालयानं आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपींना त्यांच्या पार्श्वभूमीवरुन ताब्यात घेण्यात आल्याचा युक्तिवाद यावेळी बचाव पक्षाकडून करण्यात आला. आरोपींविरोधात याआधीही गुन्हे दाखल झाले होते का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. त्यावर आरोपी याआधी अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपी होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पोलिसांनी जामिया हिंसाचार प्रकरणात १० जणांना अटक केली होती. यामधील एकही जण विद्यार्थी नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी आम आदमी पार्टीचा एक आमदार आणि काही इतर व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.