नवी दिल्ली - सोमवारी रात्री नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाले. या विधेयकाला भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेनेसुद्गा पाठिंबा दिला होता. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतरही शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाराज झाले आहेत. त्यांनी ट्विटरवरून नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जे कुणी पाठिंबा देत आहेत ते देशाच्या मुळावर घाव घालत आहेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध दर्शवताना राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की,''नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भारताच्या संविधानावरील हल्ला आहे. जे कुणी या विधेयकाला पाठिंबा देत आहेत ते या देशाच्या मुळावर घाव घालून त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.'' या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळला असला तरी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांनी या ट्विटमधून नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने राहुल गांधी शिवसेनेवर नाराज, नाव न घेता दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 4:06 PM